तृणमूलच्या आमदार वैशाली दालमियांकडून राष्ट्रगीताचा अपमान

तृणमूल काँग्रेसच्या आमदार वैशाली दालमिया राष्ट्रगीतावेळी मोबाईलवर बोलत होत्या. वैशाली दालमियांकडून झालेला राष्ट्रगीताचा अपमान कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका क्रीडा स्पर्धेदरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना वैशाली दालमिया मोबाईलवर बोलण्यात मग्न होत्या. वैशाली दालमिया या बीसीसीआय आणि आयसीसीचे दिवंगत माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या कन्या आहेत.

वैशाली दालमिया यांच्या कुटुंबाने क्रीडा जगतात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र वैशाली दालमिया एका फुटबॉल स्पर्धेदरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना सतत मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. वैशाली दालमिया कमिशनर कपच्या एका सामन्यादरम्यान उपस्थित होत्या. बेलूर पोलीस स्थानकाकडून कमिशनर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक तरुणांना संधी मिळावी, त्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेतील फुटबॉल सामन्याला सुरुवात होण्याआधी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. या स्पर्धेला वैशाली दालमिया पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मात्र राष्ट्रगीत सुरू असतानाही वैशाली मोबाईलवरच बोलत होत्या. वैशाली दालमिया होवराह मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

या स्पर्धेला वैशाली दालमिया यांच्यासोबत सहकार मंत्री अरुप रॉय, क्रीडा मंत्री आणि माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला, स्थानिक नगरसेवक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *