घाटकोपरमध्ये पोलिसांनी जप्त केलेली १० कोटी, १० लाख रुपयांची रोकड बीड येथील वैद्यनाथ सहकारी बँकेची असल्याची माहिती समोर आली आली आहे. मात्र, यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष अशोक जैन आणि बँकेच्या संचालिका आणि भाजपाच्या खासदार प्रितम मुंडे यांनी केलेले खुलाशे विसंगत असल्याने रकमेचे गुढ वाढले.
गुरुवारी रात्री घाटकोपर-मानखुर्द लिंक मार्गावरील छेडा नगरात पोलिसांनी निसान गाडी थांबवून झडती घेतली असता गाडीत १० कोटी १० लाख रुपयांची रोकड आढळून आली. बँक मॅनेजर आणि इतर दोन जण ही रक्कम कारमधून नेत होते. मात्र, त्यांच्याकडे कागदपत्रे न आढळल्याने पोलिसांनी ती जप्त केली. रोकड आणि बँकेचे तपशील तपासून पाहिले जाणार आहेत. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. प्राप्तीकर विभागाने देखील स्वतंत्रपणे तपास सुरू केला. याची पोलिसांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नागपुरात केली. दुसरीकडे, पोलिसांना सापडलेल्या रकमेचा पूर्ण हिशेब असल्याचा दावा प्रीतम मुंडे यांनी केला आहे. प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, वैद्यनाथ को-आॅपरेटिव्ह बँकेची दहा कोटींची रोकड मुंबईच्या शाखेतून पुण्याच्या शाखेत नेली जात होती. या रकमेचा पूर्ण हिशेब आहे. तर अशोक जैन म्हणाले, ही रोकड परळीच्या शाखेतून घाटकोपरच्या शाखेत नेण्यात येत होती. खा. मुंडे आणि जैन यांनी केलेल्या या खुलाशात विसंगती असल्याने या रकमेचे गुढ वाढले आहे. शिवाय, ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली ती महागडी गाडी कोणाची, याचाही तपास सुरू आहे.
बँक म्हणते, नियमानुसारच व्यवहार
आमच्या परळीच्या शाखेत जमा झालेल्या जुन्या नोटा येथील राष्ट्रीयकृत बँकेने जमा करून घेण्यास असमर्थता दाखविल्याने ही सर्व रक्कम घाटकोपर शाखेत नेण्यात आली. या २५ कोटी रूपयांचा बँकेने विमाही उतरविला होता. या सर्व रक्कमेच्या बँकेच्या शाखेत रितसर नोंदी आहेत. हा व्यवहार बँकेच्या दैनंदिन रेमिटन्सचा असून नियमानुसारच आहे.
