दिल्ली पुन्हा हादरली; २० वर्षांच्या तरुणीवर कारमध्ये बलात्कार

दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाला चार वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप राजधानीतील बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. शहरात पुन्हा एकदा एका २० वर्षांच्या तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला त्या कारवर गृहमंत्रालयाचा स्टीकर लावला असल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी नोएडा येथील रहिवासी आहे. बुधवारी ती नोकरीच्या शोधात दिल्लीला आली होती. दिवसभर वणवण केल्यानंतर रात्री साधारण नऊच्या सुमारास घरी परतण्यासाठी ती एम्स रुग्णालयाजवळ बसची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. कारचालकाने रात्र झाली आहे असे सांगून तिला नोएडा येथे सोडतो, असे सांगितले. घरी लवकर पोहोचेल, असे समजून ती तरुणी कारमध्ये बसली. त्यानंतर कारचालक बराच वेळ तिला दिल्लीच्या रस्त्यांवर फिरवत राहिला. रात्री ११ च्या सुमारास चालकाने मोतीबाग परिसरात कार थांबवली आणि तरुणीची छेड काढण्यास सुरूवात केली. त्यानंतर धमकावून तिच्यावर बलात्कार केला. तरुणी कशीबशी आपला जीव वाचवून त्याच्या तावडीतून निसटली.

भेदरलेल्या तरुणीने आपल्यावर गुदरलेला प्रसंग गस्तीवर असलेल्या पोलिसांकडे कथन केला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीची कार जप्त केली. तसेच आरोपीचा शोध सुरू केला. रात्री उशिरा मित्राच्या घरातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी गृहमंत्रालयाचा स्टिकर असलेली कार जप्त केली आहे. कारमधून पीडितेचा फोनही जप्त केला आहे. पीडितेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच १६ डिसेंबरला धावत्या बसमध्ये ‘निर्भया’वर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेरा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर २९ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. या घटनेला चार वर्षे उलटली तरी अद्याप न्याय मिळालेला नाही, अशी खंत ‘निर्भया’च्या आईने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *