रतन टाटा सोडणार टाटा ट्रस्टचे चेअरमनपद ?

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा लवकरच टाटा ट्रस्टच्या चेअरमनपदावरुन पायउतार होऊ शकतात. टाटा ट्रस्टची टाटा सन्समध्ये 66 टक्के गुंतवणूक असून, टाटा सन्स 108 अब्ज डॉलर्सच्या टाटा उद्योगसमूहातील प्रमुख होल्डींग कंपनी आहे.
नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी ट्रस्टने सल्लागार नियुक्त केला असून, पुढच्यावर्षीच्या मध्यापर्यंत ट्रस्टवर नव्या अध्यक्षाची निवड होऊ शकते. टाटा ट्रस्टचा पुढचा चेअरमन भारतीय असेल पण तो पारसी किंवा टाटा कुटुंबातील असेलच असे नाही. टाटा समूहाचे विश्वासू आर.के.क्रिष्णा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. नोंदणीकृत टाटा कंपन्यांमध्ये टाटा ट्रस्टची 41 अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे.
रतन टाटा सध्या 79 वर्षांचे असून, नव्या अध्यक्षाच्या हाती ट्रस्टची सूत्रे सोपवल्यानंतर ते जबाबदारीतून मुक्त होतील. त्याचवेळी ट्रस्ट बरोबर असलेले अनेक दशकांचे त्यांचे नाते संपुष्टात येईल. टाटा सन्सचे चेअरमनपद सायरस मिस्त्रींकडे सोपवल्यानंतरही ट्रस्टच्या माध्यमातूनही त्यांचे टाटा सन्सवर नियंत्रण होते.
सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत नव्या चेअरमनची निवड होऊ शकते. 2012 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या चेअरमनपदी बसवल्यानंतरही रतन टाटा टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कायम आहेत. टाटांच्या इतिहासात प्रथमच टाटा सन्सच्या चेअरमनपदी आणि ट्रस्टच्या अध्यक्षपदी दोन वेगवेगळया व्यक्ती होत्या. यापूर्वी टाटा सन्स आणि ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकच व्यक्ती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *