मालकाने ८०० रुपयांचा पगार थकवला, म्हणून नोकराने त्याच्या लाखो रुपये किमतीच्या टेम्पोसह पळ काढला. इतकेच नव्हे, तर चोरी पचविण्यासाठी त्याने अन्य एका टेम्पोचे कागदपत्र चोरून त्या कागदपत्रांच्या आधारे चोरी केलेल्या टेम्पोचा नंबर बदलून, गेल्या आठ महिन्यांत पगाराच्या दामदुप्पट भाडेवसुली केली. सलीम चौधरी (५०) असे प्रतापी या नोकराचे नाव असून, पोलिसांनी त्याला भायखळा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी त्याच्याकडून महागडा आयफोनही जप्त केला आहे.
मूळचा प्रतापगड येथील रहिवासी असलेला चौधरी एप्रिल महिन्यात कामानिमित्त मुंबईत आला होता. भिवंडी येथील सुरेश जैन यांच्या मिंदा डिस्ट्रिब्युटर कंपनीत टेम्पोचालक म्हणून नोकरीला लागला. बिर्याणीचे पार्सल विविध ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. दोन दिवस कामावर व्यवस्थित गेल्यानंतर, आजारी असल्याचे कारण सांगून चौधरी याने तिसऱ्या दिवशी दांडी मारली. याच रागात जैन यांनी त्याला कामावरून काढून टाकले, परंतु आपला दोन दिवसांचा ८०० रुपये पगार मालकाने द्यावा, अशी मागणी त्याने केली. जैन यांनी त्याला पैसे देण्यासही नकार दिला. याच रागात चौधरीने संधी साधून मालकाचा एम.एच. ०२ सी.ई.११२६ हा टेम्पो चोरी करून पळ काढला. ८०० रुपयांसाठी जैन यांना साडे चार लाखांना फटका बसला होता. जैन यांनी वालीव पोलीस ठाणे गाठून टेम्पो चोरीबाबत चौधरीविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करून वालीव पोलिसांनी चौधरीचा शोध सुरू केला.
चोरीचा टेम्पो घेऊन चौधरी मुंबईतल्या रस्त्यांवर बिनधास्तपणे भाडी मारत होता. टेम्पोच्या नंबरच्या आधारे पोलीस आपल्याला पकडतील, या भीतीने चौधरीने हातचालाकीने एका टेम्पोची कागदपत्रे लंपास केली. त्या कागदपत्रांच्या आधारे चौधरीने टेम्पोचा नंबर एमएच ०४ सी आर ११२६ असा बदली करून चोरीच्या टेम्पोने त्याचा नवीन व्यवसाय सुरू केला. गेल्या आठ महिन्यांपासून तो विविध कंपनीचा माल ने-आण करण्याचे काम करत होता. भायखळा परिसरातून टेम्पोमध्ये संशयास्पदरीत्या गॅस सिलिंडर घेऊन जात असताना, भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नानेकर यांनी चौधरीला हेरले. त्याला ताब्यात घेत, पोलिसी खाक्या दाखवताच चौधरीने ८०० रुपये पगार थकवल्यावरून सुरू झालेली चोरीच्या या प्रवासाची कहाणी पोलिसांसमोर कबूल केली. चौधरी वापरत असलेला महागडा आयफोनदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. हा आयफोन आपल्याला बोरीवली परिसरात मिळाला असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र, कागदपत्र चोरी, तसेच आयफोन हरविल्याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी त्याला वालीव आणि आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
