आसामच्या उद्योगपतीकडे सापडले दीड कोटींचे घबाड

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या छाप्यात मोठ्याप्रमाणात काळा पैसा बाहेर येत आहे. सोमवारी आसाम पोलिसांनी गुवाहाटी येथील एका उद्योगपतीच्या घरी टाकलेल्या छाप्यात सुमारे दीड कोटी रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम ५०० व १ हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होती.
हरजितसिंह बेदी असे या उद्योगपतीचे नाव असून त्याच्याकडे ५०० व १ हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात दीड कोटी मिळाल्याची माहिती, आसामच्या सीआयडी विभागाचे महानिरीक्षक रौनक अली हजारिका यांनी दिली. गोवाहाटी शहरात हरजितसिंह बेदीच्या मालकीचे एक रेस्तराँ आणि बार आहे. हा सर्व पैसा आपल्या स्वत:चा असून तो काळा पैसा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंबंधीचे सर्व कागदपत्रे आपणाकडे असल्याचे त्याने म्हटले आहे. यासंबंधी प्राप्तिकर विभागाला चौकशी करण्यास सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेदी यांच्या बेलतोला परिसरातील फ्लॅटमध्ये छापा टाकण्यात आला. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत बेदीच्या फ्लॅटची चौकशी सुरू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही हजारिका यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी सीआयडीने गुवाहाटी शहरातील हतीगाव परिसरातील आणखी एका व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकला होता. तेथेही ८० लाख रूपये २००० रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात मिळाले होते.
सोमवारी दिल्ली पोलिसांनी मोठी रक्कम जप्त केली होती. दक्षिणपूर्व दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात एका लॉ फर्मवर टाकलेल्या छाप्यात १३ कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. यातील २.६ कोटी रूपयांच्या नव्या नोटा होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *