मुंबई आणि परिसराचे हेलिकॉप्टरमधून दर्शन घडवणा-या ‘जॉय राईड’मधील एक हेलिकॉप्टर रविवारी मुंबईच्या गोरेगाव येथील आरे कॉलनीत कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरच्या पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रफुल्लकुमार मिश्रा (५३) असे त्यांचे नाव असून ते भारतीय हवाई दलातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल होते. कारगील युद्धातही ते सहभागी झाले होते. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचा तंत्रज्ञ आणि पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास जुहू येथील हेलिकॉप्टर तळावरून रितेश अमरीश मोदी (३५), वृंदा मोदी आणि तंत्रज्ञ संजीव शंकर (२४) यांच्यासह प्रफुल्लकुमार हे हेलिकॉप्टर घेऊन निघाले. गोरेगावची फिल्मसिटी पाहिल्यानंतर हे हेलिकॉप्टर परतीच्या प्रवासाला निघाले होते.
मात्र यावेळी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रफुल्लकुमार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. यानंतर आरे कॉलनीच्या फिल्टरपाडयातील रॉयल पाम्सच्या हेलिपॅडवर हे उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी हेलिकॉप्टर कोसळले आणि त्याने पेट घेतला.
हा अपघात पाहून स्थानिकांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली आणि त्यात अडकलेल्या सर्वाना बाहेर काढले. अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात या सर्वाना नेण्यात आले, मात्र तोपर्यंत प्रफुल्लकुमार मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या ३ गाडयांनी या घटनेनंतर धाव घेत आग नियंत्रणात आणली.
दुर्घटनेची चौकशी होणार!
दरम्यान, या अपघातानंतर डीजीसीएने घटनास्थळी धाव घेत अपघाताच्या कारणांचा शोध घेणे सुरू केले आहे. घटनास्थळी असलेल्या हेलिकॉप्टरच्या अवशेषांमधून काही गोष्टी डीजीसीएने ताब्यात घेतल्या असून एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) या अपघाताचा तपास हाती घेतला आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला? आणि हेलिकॉप्टरमध्ये काय तांत्रिक बिघाड झाला होता? हे लवकरच समोर येणार आहे.
