शशिकला यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यापासून ते मंत्र्यांची रांग

तामिळनाडूचं खंबीर नेतृत्व आणि मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झालं आहे, पण पोएस गार्डन परिसरातील त्यांचं निवासस्थान ‘वेद निलायम’ आता राजकीय शक्ती आणि सत्तेचं केंद्र झालं आहे असंच म्हणावं लागेल. अण्णाद्रमुक पक्षासाठी आणि राज्य सरकारसाठी अजूनही जयललितांचं निवासस्थाचं सत्ताकेंद्र आहे. गुरुवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यासहित अन्य मंत्र्यांनी वेद निलायम बंगल्यावर जाऊन जयललिता यांच्या जवळची मैत्रीण शशिकला यांची भेट घेतली.

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडेच राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. शशिकला यांच्या खांद्यावर जयललितांनी पेललेल्या सर्व जबाबदा-यांसहित अधिकारही मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच मंत्र्यांनी शशिकला यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. जयललिता यांच्यानंतर पक्षावर नियंत्रण ठेवण्याचं काम शशिकला करण्याची शक्यता आहे. जयललिता पक्षाच्या सरचिटणीसदेखील होत्या, जे पद सध्या रिकामे आहे. पक्षाकडून लवकरच सरचिटणीसपदाची घोषणा होऊ शकते.
महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेते के. ए. सेनगोट्टिया गुरुवारी शशिकला यांची भेट घेतली. 2012 मध्ये जयललिता यांच्यासोबत झालेल्या वादानंतर त्यांची राज्य मंत्रीमंडळातून हाकलपट्टी करण्यात आली होती. पक्षाची सर्व सुत्रे शशिकला यांच्या हाती जाण्याची शक्यता असल्याने सर्व ज्येष्ठ नेत्यांनी भेटीगाठी सुरु केल्या असून आपलं पारडं जड करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं बोललं जात आहे.
जयललिता यांनी शशिकला यांचे पती एम नटराजन आणि इतर कुटुंबियांना पक्षापासून दूर ठेवले होते. पण विशेष म्हणजे गुरुवारी नटराजन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करताना पाहण्यात आलं, त्यामुळे तर्क- वितर्क लावले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *