पावसामुळे मंत्रालयात सामसुम…

पावसामुळे मंत्रालयात सामसुम…

संततधार पडणाऱ्या पावसाने मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेसेवेला ठप्प केल्याचा फटका मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीला बसला. त्यामुळे राज्याच्या प्रशासनाचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी म्हणजे जेमतेम 15 ते 20 टक्के उपस्थिती होती.

एरवी मंत्रालयात काही हजाराने दिसणारी गर्दी आज शेकड्यातही दिसत नव्हती. मंत्रालय अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सात हजार तीनशेच्या आसपास आहे. मध्य, हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाल्याने कल्याण, डोंबिवली, बदलापूर, तसेच बेलापूर, वाशी, पनवेल आदि ठिकाणी राहणारे अधिकारी- कर्मचारी यांना मंत्रालयात येता आले नाही. त्यामुळे मंत्रालयात आज वरळी, बांद्रा, आदी ठिकाणच्या शासकीय वसाहतीत राहणारे थोडेफार चाकरमाने मंत्रालयात उपस्थित होते. त्यामुळे मंत्रालयास अद्याप अधिकृत सुटी जाहीर झाली नसली तर आजच्या दिवसाचे शासकीय कामकाज वाया गेले आहे.. जे कर्मचारी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून मंत्रालयात पोचले आहेत त्यांनाही घरी जाण्याची घाई झाली असली तरी अद्याप रेल्वे सेवा सुरळीत झाली नसल्याने चिंता लागली आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक होऊन मुंबईतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी वॉट्‌सऍपवर आलेले मेसेज वाचणे आणि घरी फोन करून विचारपूस करीत आहेत.

मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागाची आपत्कालीन विभाग दोन पाळ्यांत सुरू आहे. यामध्ये शिपाई, फोटोग्राफर, उपसंपादक, कॅंमेरामन आदी कर्तव्यावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *