मध्य प्रदेशातील सफेद वाघिणीचा मृत्यू

मध्य प्रदेशातील सफेद वाघिणीचा मृत्यू

 मुकुंदपूरमधील जगातील पहिली व्हाइट टायगर सफारी पार्कमधली सफेद वाघीण राधा हिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. पार्कमधील एका वाघाने  केलेल्या हल्ल्यात राधा वाघीण गंभीर जखमी झाली होती, यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  दरम्यान पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राधा वाघीण आजारी होती. तिने खाणे-पिणे सोडले होते. प्राणीसंग्रहालयातील डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांना यश आले नाही.  मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती खालावली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
बुधवारी पर्यटकांसाठी सफारी पार्क बंद
पार्कमधील सफेद वाघीण राधाच्या मृत्यूनंतर तिला दफन करण्याच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्राणीसंग्रहालय आणि सफारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राधा वाघिणीवर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी एका वाघाने केला हल्ला
सफारी पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी राधाला रॉयल बंगाल टायगर नकुलसोबत सोडण्यात आले होते. यावेळी त्याने राधावर हल्ला केला, ज्यात ती गंभीर जखमी झाली. तेव्हापासून राधाच्या प्रकृतीत बिघाड सुरू झाल्याचे कळते आहे.
भिलाईमध्ये झाला होता राधाचा जन्म
राधा वाघिणीचा जन्म छत्तीसगडमधील भिलाई येथील मैत्रिबाग प्राणीसंग्रहालयात 29 नोव्हेंबर 2011मध्ये झाला होता. तिला मुकुंदपुरात रघु नावाच्या सफेद वाघासोबत आणण्यात आले होते. याकाळात राधा आणि रघुला सफारी पार्कमध्ये एकत्र सोडण्यात आले होते. जेणेकरुन दोघांच्या मिलनामुळे सफेद  वाघांच्या प्रजातींची संख्या वाढण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *