तामिळनाडूच्या लोकप्रिय दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे. फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. आपल्या लाडक्या अम्मांना निरोप देण्यासाठी लाखो लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. आपल्या लाडक्या नेत्याचे तामिळनाडूच्या जनतेला अंत्यदर्शन घेता यावे यासाठी राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.
सर्वसामान्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन जयललितांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जयललिता यांच्या निधनामुळे छत्र हरपल्याने अनेक अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला आहे.
हिंदू ब्राम्हण रिवाजानुसार जे जयललिता यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात येणार नसून त्यांच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात येणार आहे. चेन्नईच्या मरीना बीचवर जयललिता यांचा दफनविधी होणार आहे. मागच्या 75 दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या जयललिता यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले.
जयललिता यांचे राजकीय मार्गदर्शक आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या स्मारकाशेजारीच जयललिता यांचा दफनविधी होणार आहे. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जयललितांचे जिथे दफन होणार आहे तिथे विशेष खड्डा तयार करण्यात आला असून, संपूर्ण दफनविधीच्या स्थळावर हॅलिकॉप्टरमधून लक्ष ठेवण्यात येत आहे.