मुंबईतील गोदीत युद्धनौका कलंडली

मुंबई गोदीत डागडुजीसाठी उभी असलेली नौदलाची आयएनएस बेतवा युद्धनौका कलडंल्याने झालेल्या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला, तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत. या अपघातात युद्धनौकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्रह्मपुत्र वर्गातील भारतीय बनावटीची आयएनएस बेतवा ही युद्धनौका डागडुजीसाठी मुंबईतील नौदलाच्या गोदीत उभी होती. सोमवारी दुपारी २च्या सुमारास ही युद्धनौका समुद्रात उतरविण्याच्या प्रयत्नात टेकूवरून घसरली आणि पाण्यात कलंडली. या अपघातात १६ नौसैनिक तेथे अडकून पडले. त्यातील १४ जणांची सुटका करण्यात यश आले, मात्र उर्वरित दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली. युद्धनौका समुद्रात उतरवली जात असताना नौकेला टेकू देणाऱ्या प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. असा विचित्र अपघात पहिल्यांदाच झाला असून ही युद्धनौका पुन्हा उभी करण्यास किती अवधी लागेल याबाबत सध्या साशंकता असल्याचे नौदलातील सूत्रांनी सांगितले. आयएनएस बेतवा या युद्धनौकेचे वजन ३८०० टन असून लांबी १२६ मीटर आहे. ३० सागरी मैल प्रति तास या वेगाने प्रवास करणारी ही युद्धनौका २००४ मध्ये नौदलात दाखल झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणाऱ्या या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रे तसेच क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *