रिझर्व्ह बँक म्हणते, खात्यातून अधिक रक्कम काढता येईल

खातेदारांनी कायदेशीर चलन जमा केल्यानंतर त्यांना बॅँकेतून मिळणा-या पैशांवरील निर्बंध रिझर्व्ह बॅँकेने मंगळवारी हटवले. मात्र, जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जमा केल्यानंतर खातेदारांना आठवडय़ाला २४ हजार रुपये मिळतील.

रोख रक्कम भरण्यावर आलेल्या निर्बंधामुळे नागरिक बॅँकेत पैसे भरत नव्हते. त्यामुळे बाजारात नव्या नोटांचे चलन होत नव्हते. त्यामुळे रिझर्व्ह बॅँकेने हा नवीन निर्णय जाहीर केला. आता २९ नोव्हेंबरनंतर १०, २०, ५०, १००, पाचशे व दोन हजारच्या नवीन नोटा बॅँकेत भरल्यास तुम्हाला हवे तितके पैसे काढता येऊ शकतील.

नऊ नोव्हेंबरपर्यंत खातेदारांनी बॅँक व एटीएममधून आतापर्यंत २.१६ लाख कोटी रुपये काढले तर ८.११ लाख कोटी रुपये बॅँकेत नागरिकांनी जमा केले. तसेच पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बदलताना बॅँकेत ३३९४८ कोटी रुपये जमा केले आहेत.

नवीन चलनी नोटांची छपाई करताना केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाला मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बाजारात चलनाची टंचाई निर्माण झाली आहे. नोटाबंदीपूर्वी किरकोळ व घाऊक विक्रेते आपल्या व्यवसायातील रोजची रक्कम बॅँकेत जमा करत होते. आता रोख रक्कमेच्या टंचाईमुळे छोटय़ा नोटांद्वारे रक्कम जमा करणे कठीण बनले आहे. नवीन नियमांच्या भीतीने नागरिकांनी बॅँकेत रक्कम टाकण्यास कचरत आहेत. त्यामुळेच रिझव्‍‌र्ह बॅँकेने नवीन नियम जारी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *