बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवला जात आहे. स्वत: संजय दत्त या चित्रपटामध्ये रस घेत असून प्रत्येक गोष्टीची माहिती घेत आहे. चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भुमिका निभावणार आहे. मात्र संजय दत्तला हे आवडलेलं दिसत नाही. त्याच्या घरी झालेल्या पार्टीत संजय दत्तने रणबीर कपूरला हे बोलूनदेखील दाखवलं, इतकंच नाही तर सर्वांसमोर अपमानदेखील केला. राजकुमार हिरानी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून विधू विनोद चोप्रा निर्मिती करत आहेत.
सुरुवातीपासूनच या चित्रपटाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट असल्याने अनेक मोठी नावं यामध्ये आहेत, त्यामुळे संजय दत्तने काही गोष्टी न दाखवण्यावर भर दिला आहे. मात्र रणबीर आपली भुमिका निभावतोय हे संजय दत्तच्या पचनी पडलेलं नाही. आपल्या घरी झालेल्या पार्टीत संजय दत्तने दारुच्या नशेत रणबीर माचो चित्रपट करण्यासाठी अजिबात योग्य नसल्याचं बोलला आहे. हे सर्व बोलताना रणबीर कपूर तिथेच उपस्थित होता.
संजय दत्तने आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती. पार्टीत रणबीर, राजकुमार हिरानी आणि डेव्हिड धवन उपस्थित होते. संजय दत्तने रणबीरशी बोलणं सुरु केलं, ‘ मी तुला घेऊन लड्डू नावाचा चित्रपट करणार आहे’ असं संजय बोलल्यानंतर रणबीरने प्रश्नार्थक स्वरुपाने पाहिलं. ‘हो लड्डू, त्यानंतर इमरती, जलेबी आणि पेढा नावाचे चित्रपट असतील’, असं म्हणत संजय दत्तने रणबीरची फिरकी घेत अपमान करण्यास सुरुवात केली.
‘मी टीव्हीवर नुकताच तुझा बर्फी चित्रपट पाहिला. काय म्हणून तू असे चित्रपट करतोस ? माझ्या आयुष्यावरील चित्रपटात तू माझी भूमिका निभावत आहेस. यांनी तुला काय म्हणून चित्रपटात घेतलं कळत नाही आहे. तू माचो मॅन वाटला पाहिजे, माचो चित्रपटात काम कर. बर्फीसारखे चित्रपट करणं बंद कर. हातात बंदूक घेऊन अॅक्शन चित्रपट करत जा. तुला वाटतं का मी, सलमान आणि अजय देवगणने माचो चित्रपट केले नसते तर आम्ही इतके वर्ष टिकले असतो असं तुला वाटतं का ?’, असं संजय दत्त बोलत राहिला. इतर सेलिब्रेटिंनी संजय दत्तला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण संजय दत्त बोलतच सुटला होता. शेवटी संजय दत्तची पत्नी मान्यताने रणबीरची सुटका केली.
