पगाराच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बँकांकडून पोलीस सुरक्षेची मागणी

निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर गुरुवारी पहिल्या मासिक पगाराच्या दिवशी बँकांमध्ये पुन्हा एकदा पैशांची चणचण जाणवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत रिझर्व्ह बँकेकडून बँकेतून पैसे काढण्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये आणखीनच भर पडू शकते. मासिक पगाराच्या दिवशी बँक खात्यात जमा रक्कम काढण्यासाठी नोकरदार आणि निवृत्तांना पुढचे दोन आठवडे कष्टाचेच जाणार असल्याचे संकेत आहेत. याचे कारण प्रत्येक बँकेला नव्या छापलेल्या नोटा रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात उपलब्धच झालेल्या नाहीत. सर्वाधिक वेतनखाती ज्या बँकेची आहेत त्यांना प्राधान्याने नोटा देण्याचे धोरण रिझव्‍‌र्ह बँकेने आखल्याने अन्य बँकांच्या ग्राहकांची परवड होण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे आज बँकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर बँक संघटनेने सरकारला बँकांमध्ये पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. याशिवाय, आजपासून पेट्रोलपंपावर ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा स्विकारणेही बंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १५ डिसेंबरपर्यंत पेट्रोलपंपांवर जुन्या नोटा स्विकारण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आज औपचारिक घोषणा करून हा निर्णय रद्द केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

बहुतांश कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांचा पगार थेट बँकेत जमा केला जातो. मात्र, चलनटंचाईमुळे ही रक्कम बँकेतून काढण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, अशी आश्वासने दिली जात असताना अनेक एटीएम केंद्रे ८ नोव्हेंबरपासून बंदच आहेत. जी एटीएम केंद्रे कशीबशी सुरू आहेत तिथेही पगाराच्या दिवशी पैसे काढण्यासाठी गर्दी होणार या शक्यतेने रविवारपासूनच रांगा लागत आहेत. त्या एटीएमवरील लोकांची गर्दी ६० ते ७० टक्क्यांनी वाढल्याचे दिसले आहे. प्रत्यक्ष गुरुवारपासून तर या गर्दीत लक्षणीय वाढ होण्याचीच शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेच्या ५० हजार एटीएम मशिन्सपैकी ४० हजार मशिन्स री कॅलिबरेट झाल्याचं सांगितले आहे. ३८ हजार मशिन्समधून नव्या नोटा दिल्या जात आहेत. बँकेच्या सर्व एटीएममध्ये लवकरच रिफिल करण्याची व्यवस्था करण्यात येईल असं बँकेच्या उपप्रबंधक मंजू अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *