गोरेगाव येथील इराणीवाडी परिसरात राहणाऱ्या चंदन सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मंगळवारी रात्री अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी बुधवारी एका महिलेसह दोघांना अटक केली.
येथील बडी मस्जिद परिसरात सिंग हे पत्नी चांदनी (२८) आणि मुलगा आदर्श (४) यांच्यासोबत राहतात. या हल्ल्यात चंदन सत्तर टक्के, चांदनी या चाळीस तर आदर्श तीस ते चाळीस टक्के भाजला आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बांगडीच्या कारखान्यात काम करणाऱ्या चंदनचे दोन दिवसांपूर्वी मालक अशपाक मोराब याच्याशी वाद झाला होता.
पंधरा वर्षे या कारखान्यात काम करूनही मोराब हा चंदनच्या नंतर येथे नोकरीस लागलेल्या सबिरा या महिलेला महत्त्व देतो, त्यांच्यात भेदभाव करतो, असे चंदनचे म्हणणे होते. त्यामुळे हा वाद झाला होता आणि याचा राग मोराबच्या मनात होता.
सिंग कुटुंबीयांवर फेकण्यात आलेले अॅसिड हे मोराबच्या कारखान्यातील असल्याचे तपासात उघड झाले आहे. चांदनी यांच्या जबाबावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.
मोराब आणि सबिरा यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा हल्ला मोराबने स्वत: केला की, कोणाकरवी करविला? याची चौकशी सुरू आहे, असे परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी सांगितले
