राजधानी एक्सप्रेसच्या शौचालयात सापडले साडेचार लाख रुपये

५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून एकाएकी बाद झाल्यानंतर बेहिशोबी रोकडचा हिशोब कसा द्यायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातूनच रोज देशातील विविध भागातून जळालेल्या नोटा सापडल्याच्या बातम्या येत आहेत. काल बुधवारी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या शौचालयात रेल्वे पोलिसांना साडेचार लाखाची रोकड सापडली.
ही सर्व रोकड ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या चलनामध्ये  होती. चलनातून बाद झालेल्या नोटा अशा प्रकारे सापडण्याची  ओदिशामधील ही पहिली घटना आहे. राजधानी एक्सप्रेसच्या बी-६ डब्ब्याच्या शौचालयातून रेल्वे पोलिसांनी ४.५ लाखाची रोकड ताब्यात घेतली. ही सर्व रक्कम इन्कम टॅक्स अधिका-यांकडे सोपवण्यात आली.
 ज्याने कोणी हे पैसे शौचालयात टाकले होते त्याचा आम्ही शोध घेत आहोत असे रेल्वे पोलिसांचे एसपी संजय कौशल यांनी सांगितले. या प्रकरणी केंद्रपाडा जिल्ह्यातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. खरगपूरजवळ शौचालयात आतमधून बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी दरवाजावर थाप मारल्यानंतर आतून दरवाजा उघडला. त्यावेळी समोर तिघेजण उभे होते. जमिनीवर नोटा विखरुन पडलेल्या होत्या. अधिक शोध घेतला असता मोठी रोकड सापडली. या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *