जवळपास सर्वच शहरांतील बँकांमध्ये रोख रकमेची प्रचंड कमतरता होत असल्याने बँकांना नव्या नोटांचा पुरवठा करण्यासाठी आरबीआयने कंबर कसली आहे. नेहमी होणा-या रोख रकमेच्या पुरवठ्यात चारपटीने वाढ करण्यात आली आहे. प्रिटिंग प्रेसमधील कर्मचा-यांचे कामाचे तास वाढवण्यात आले असून कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. आरबीयच्या मालकीची म्हैसूर आणि सलबोनी तर सरकारच्या मालकीची नाशिक आणि देवासमधील प्रिटिंग प्रेसचे कर्मचारी 500 च्या नव्या नोटांचा पुरवठा बँकांमध्ये वाढवण्यासाठी अतिरिक्त काम करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
खासगी बँकांमध्ये रोख रकमेचा प्रचंड तुटवडा जाणवत असून पुरवठा अत्यंत कमी झाल्याचं दिसत आहे. हा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न सुरु असून यामुळे येत्या काही दिवसांसाठी परिस्थिती सुधारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नोटाबंदीनंतर नोकरदारांचा पहिला पगार आणि पेन्शनर्सच्या पेन्शनची रक्कम विविध बँकांच्या खात्यांमध्ये जमा झाली आहे. तरीही मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिकसह राज्यातील जवळपास सर्वच शहरांतील बँकांमध्ये रोख रकमेची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे बँकेतून पैसे मिळतील की नाही, अशी धडकी लाखो नोकरदारांना भरली आहे. गुरुवारी पगारदार व पेन्शनर्सना हवी तितकी रक्कम मिळेलच, याची खात्री द्यायला बँकाही तयार नाहीत.
बँकांना होणा-या रोख रकमेचा पुरवठा नक्कीच सुधारेल. आम्ही 500 च्या नोटा एअरलिफ्ट करुन पुरवठा करत आहोत. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तणाव असेल मात्र नंतर परिस्थिती सुधारेल असं सरकारी सुत्रांकडून कळत आहे. जितका पुरवठा बँकांना होत होता, त्यामध्ये आता चारपटीने वाढ करण्यात येणार आहे.
बुधवारी अनेक बँकांमध्ये पुरेशी कॅश नव्हती. त्यामुळे अनेक बँकांनी दरवाजे आधीच बंद केले, तर काहींनी खातेदार आल्यानंतर, आज पैसे मिळू शकणार नाहीत, असे सांगितले. बऱ्याच एटीएममध्येही खडखडाटच असल्याचे चित्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये होते. उद्या खातेदारांची, विशेषत: सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनर्सची गर्दी भरपूर असेल. पण आमच्याकडे पुरेशी रोख रक्कम न आल्यास आम्हाला त्यांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असे एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने सांगितले. अर्थात पेन्शनर्स आणि जवानांच्या खात्यांतून त्यांना लगेच पैसे प्राधान्याने देण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने आधीच दिल्या आहेत.
