रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जनधन खात्याबाबत महत्वपुर्ण निर्णय घेतला असून आता महिन्याला केवळ 10 हजारच रुपये काढता येणार आहेत. शेतकरी आणि जन धन खातेधारकांना पैशांची अफरातफर करणा-यांपासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी घेण्यात आला आहे. खातेदाराला दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्याला या पैशांच्या खर्चाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असेल, असे निर्देश आरबीआयने बँक मॅनेजर्सना दिले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जनधन योजनेची घोषणा केली होती. नरेंद्र मोदींनी नोटाबंदी निर्णय जाहीर करत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून जनधन खात्यांमधील ठेवींमध्ये वाढ होत आहे. जनधन खात्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला जात असल्याची शंका आहे. त्यामुळे आळा ठेवण्याच्या दृष्टीने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
जनधन खातेदार 10 हजार पर्यंतची रक्कम खात्यातून काढू शकतो. मात्र जर त्याला त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर खर्चाची योग्य कागदपत्रे ब्रांच मॅनेरजकडे सादर करावी लागणार आहेत, त्यानंतरच जास्त रक्कम काढता येईल.
ऑगस्ट 2014 मध्ये जेव्हा जनधन योजना सुरु करण्यात आली होती तेव्हा 16 महिन्यांत जनधन खात्यांमध्ये एकूण 27 कोटी जमा झाले होते. मात्र नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये जनधन खात्यांमधील रक्कम 60 टक्क्यांनी वाढली असून एकूण 72 कोटी कोटी रुपये जमा झाले आहेत.
