नगरपालिकांचा कौल कुणाला? ७० टक्के मतदान

राज्याच्या २५ जिल्ह्यांमधील तब्बल १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींसाठी किरकोळ हिंसाचाराचे प्रकार वगळता रविवारी शांततेत सरासरी ७० टक्के मतदान झाले. अपेक्षित मतदान न झाल्याने सर्वांच्या नजरा सोमवारी दुपारपर्यंत जाहीर होणाऱ्या निकालांकडे लागल्या आहेत.

भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी निवडणूक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या पालिकांमधील आधी असलेला वरचष्मा टिकवण्याचे आव्हान राष्ट्रवादी व काँग्रेससमोर आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा या निवडणुकीवर परिणाम होतो का, हेही निकालात दिसून येईल.

अमळनेर, तासगावमध्ये हाणामारी

जळगाव जिल्ह्यात अमळनेरमध्ये पैसेवाटपाच्या संशयावरून आमदार शिरीष चौधरी व जिल्हा बँक संचालक अनिल पाटील यांच्यात वाद होऊन कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. संतप्त जमावाने चौधरींच्या वाहनाची तोडफोड केली. त्यांचे निवासस्थान व कार्यालयाच्या काचा फोडल्या. एरंडोलमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दशरथ महाजन व माजी नगरसेवक अनिल दाभाडे यांच्यात हाणामारी झाली.

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर व तासगावमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तासगावमध्ये भाजपा खासदार संजय पाटील यांच्यासमोर काँगे्रसचे तालुकाध्यक महादेव पाटील यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. इस्लामपूरमध्येही मारहाणीच्या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

वाशिममध्ये गुप्त मतदानाला सुरुंग!

वाशिम येथे राणी  लक्ष्मीबाई कन्या शाळेमध्ये मतदान केंद्रावरील भारत बोरकर हा कर्मचारी मतदारांऐवजी स्वत:च ‘ईव्हीएम’वरील विशिष्ट चिन्हाचे बटन दाबत असल्याचा धक्कादायक प्रकार  कॅमेरामध्ये टिपला.

बुलडाणा येथील चैतन्यवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह १० ते १२ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. अकोल्यातील पातूर येथे दोन उमेदवारांमध्ये मारहाण झाली. अकोटला पोलिसांनी एकास ८२ हजार रुपयांसह ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *