जगातील उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाची स्वारी फत्ते केलेल्या फ्रान्समधला एलन रॉबर्ट यानं आता बार्सिलोनामधील एका गगनचुंबी इमारतीवर चढाई केली आहे. विशेष म्हणजे 54 वर्षीय एलन 38 मजल्यांच्या इमारतीवर कोणत्याही सुरक्षा उपकरणांविना अवघ्या तासाभरात चढला आहे. या इमारतीचं नाव टोरे अगर टॉवर असून, ती पूर्णतः काचेनं बनवण्यात आली आहे.
एलनचा हा पराक्रम पाहण्यासाठी इमारतीजवळ लोकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी स्थानिक प्रशासनानं सुरक्षा व्यवस्थेचाही चोख ठेवली होती. मात्र एलननं कोणतीही चूक न करता इमारतीची चढाई केली आहे. मात्र इमारत चढून खाली आल्यावर पोलिसांनी एलनला अटक केल्यानंतर त्याला चेतावणी देऊन सोडून देण्यात आलं आहे. तसेच एलन यानं जगभरातल्या जवळपास 100 गगनचुंबी इमारती स्वार केल्या आहेत. एलन कोणत्याही इमारतीवर चढताना सुरक्षेचं साहित्य सोबत ठेवत नाही. फक्त ट्रेकिंग शूज आणि चॉक घेऊन तो इमारतीची स्वारी पार करतो.
एलन यानं यापूर्वीही सॅन फ्रान्सिस्कोमद्ये गोल्डन गेट ब्रिज, दुबईमधली बुर्ज खलिफा आणि पॅरिसमधला आयफेल टॉवर, सिडनीतला ओपेरा हाऊसवरही सुरक्षा व्यवस्थेशिवाय चढाई केली आहे.
