पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये अकोल्यातील हॉटेल मालकाचा गौरव

नोटबंदीनंतरच्या उपक्रमाचे मोदींनी केले कौतुक

केंद्र सरकारच्या नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली. त्यातच प्रवासात असलेल्यांना तर मोठय़ा समस्यांचा सामना करून त्यांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला. अशा प्रवाशांना अकोला जिल्ह्य़ातील पारस फाटय़ाजवळील हॉटेल मालकाने आपल्या कृतीतून दिलासा दिला. ‘जेवण करून जा, पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या!’ असा फलकच हॉटेलसमोर लावून शेकडो प्रवाशांसाठी जेवणाची सोय करून दिली. हॉटेल मालकानी दिलदारपणे राबविलेल्या या उपक्रमाचा पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरवपूर्ण उल्लेख करून नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.

बाळापूरमधील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील मराठा हॉटेलने संकटातील प्रवाशांना हा दिलासा दिला. प्रवासी उपाशी राहू नयेत, यासाठी हॉटेल मालक अ‍ॅड. मुरलीधर राऊत यांनी त्यांना उधारीवर जेवण करण्याची सोय उपलब्ध करून दिली. ५००, १ हजार रुपयांच्या नोटा असतील, तर चिंता करू नका, जेवण करून जा व पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या, असा फलकच हॉटेलबाहेर लावला. त्यामुळे पारस फाटय़ाजवळ असलेल्या या हॉटेलमध्ये सर्व ग्राहक पोट भरून जेवण करून गेले. प्रवाशांना त्यांच्या मनपसंतीनुसार ऑर्डरप्रमाणे जेवण देण्यात आले. मराठा हॉटेल मालकाच्या या आदर्श उपक्रमाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. नरेंद्र मोदी यांनी हॉटेल मालक अ‍ॅड.मुरलीधर राऊत आणि त्यांच्या मराठा हॉटेलचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे भरभरून कौतुक केले. याबद्दल बाळापूर परिसरासह अकोला जिल्ह्य़ातही आनंद व्यक्त केला जात आहे.

‘मोदींनी केलेल्या कौतुकाने भारावून गेलो’

हॉटेल मालक अ‍ॅड. मुरलीधर राऊत म्हणाले की, ‘आपल्या छोटय़ाशा उपक्रमाची एवढय़ा मोठय़ा पातळीवर दखल घेऊन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याने आपण भारावून गेलो आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरीपुत्र आहे. पैशाअभावी कुणीही उपाशी राहू नये, हीच आमची भूमिका होती. अडचणीतील सुमारे ५०० प्रवाशांना आम्ही जेवण देऊ शकलो. त्यापैकी १०० प्रवाशांनी जेवणाचे पैसे परत आल्यावर आणून दिले, असेही त्यांनी सांगितले. अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे, यातच मोठे समाधान असल्याचे अ‍ॅड.मुरलीधर राऊत मानतात. त्यामुळे अशा प्रकारचे ते विविध उपक्रम राबवत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *