अभिनेत्रीची ११ गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमधील लाहोर येथे रंगभूमीवरील अभिनेत्रीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. किस्मत बेग ही अभिनेत्री स्टेज परफॉर्मन्स नंतर गुरुवारी संध्याकाळी घरी परतत होती. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी आणि मोटरसायकलवरून आलेल्या काही अज्ञातांनी किस्मतला वाटेत थांबवले आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत किस्तमला ११ गोळ्या लागल्याचे कळते. सदर घटनेनंतर किस्मत आणि तिच्या ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे किस्मतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या ड्रायव्हरची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते. किस्मतच्या हत्येमागे तिचा पूर्वाश्रमीच्या प्रियकराचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलीस अधिकारी असगर हुसैन म्हणाले की, हल्लेखोर थिएटरबाहेर तिची वाट पाहत होते. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघताच त्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. किस्मतला यापूर्वीही काही बंदुकधा-यांनी निशाण्यावर धरले होते. मात्र, त्यावेळी ती वाचली होती. प्राथमिक तपासादरम्यान फैसलाबाद शहरातील एका व्यावसायिकाशी तिचे संबंध असल्याचे समोर आले. चौकशीसाठी व्यवसायिक आणि किस्मतच्या नातेवाईकांना आम्ही बोलवणार असून लवकरच त्या हल्लेखोरांचा शोध घेऊ, असे पोलीस अधिकारी म्हणाले.

किस्मतची आई म्हणाली की, आमच्या कुटुंबाचे कोणाशीच वैर नव्हते. किस्मतच्या हत्येचा आम्ही निषेध करु. लवकरात लवकर तिच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांचा तपास लागायला हवा. दरम्यान, अशा प्रकारे हत्या झालेली किस्मत ही पहिली स्टेज अभिनेत्री नव्हे. यापूर्वी, नादरा, नागू, यास्मिन, नैना, नगिना, मार्वी, करिष्मा, संगम आणि आरजू या रंगभूमीवरील अभिनेत्रींचाही त्यांचे पूर्वाश्रमीचे प्रियकर आणि त्यांच्या शत्रूंकडून हत्या करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *