अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, भाकपचे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेना संवेदनशून्य आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेवरही उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आणखी किती वर्षे, किती काळ या प्रकरणात वाट बघायची, असा प्रश्न ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी गुरुवारी केला.
एन. डी. पाटील म्हणाले की, दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नाही, हे लज्जास्पद आहे. तपास जलदगतीने व्हावा यासाठी सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो; तरीही या तपासात प्रगती दिसत नाही. त्यावर ‘तुमच्या भावना सरकारला कळवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिले. शिष्टमंडळात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. विलास रणसुभे, डॉ. शरद भुथाडिया, श्यामकांत जाधव, दिलीप पवार, एस.बी. पाटील, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर आदींचा सहभाग होता.
गोविंद पानसरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील लेखक, कवी, चित्रकार, कलाकारांमार्फत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले.
