१५ डिसेंबरनंतर खड्डा दाखवा, हजार रुपये मिळवा- चंद्रकांत पाटील

राज्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा कृती आराखडा सरकारने तयार केला आहे. त्यानुसार सध्या युद्धपातळीवर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. येत्या १५ डिसेंबर पर्यंत हे खड्डे भरले जातील त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यावर खड्डा दाखवून देणाऱ्यास एक हजार रूपयांचे इनाम देण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी येथे केली

सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ८६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील १६ हजार किमी लांबीच्या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार असून हे रस्ते केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांपैकी २० हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख राज्य आणि जिल्हा मार्गावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १५ डिसेंबरपूर्वी सर्व प्रमुख मार्गावरील खड्डे भरले जातील असा दावाही पाटील यांनी यावेळी केला. एवढेच नव्हे तर १५ डिसेंबर नंतर रस्त्यावर खड्डा दाखवून देणाऱ्यांना एक हजार रूपयांचे इनामही देण्याची घोषणा त्यांनी केली.

पावसामुळे रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. रस्त्यांवर खड्डे भरण्यासाठी वर्षांला सुमारे १५००कोटी रूपये  खर्च केले जाताता. त्यामुळे रस्ते बांधणीच्या पूर्वीच्या धोरणातच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता जागतिक मानांकनाप्रमाणे रस्ते बनविण्यात येणार आहेत. पुढील दोन- तीन वर्षांत १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून तालुका ते जिल्हा मुख्यालय, जिल्हा मुख्यालय शेजारील जिल्हा मुख्यालय आणि जिल्हा मुख्यालय ते विभागीय आयुक्तालय अशा पद्धतीने हे रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यात अष्टविनायक व अन्य धार्मिक तसेच पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. दोन वर्षांत ठेकेदारास ४० टक्के रक्कम दिली जाणार असून उर्वरित ६० टक्के रक्कम १३ वर्षांत ठेकेदारास समान हप्त्यात देण्यात येणार आहे. या रस्त्यांची १५ वर्षे देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदारावरच राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *