नागपूर-अमरावती रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गोंडखैरी टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. एका वाहनातून ही रोख रक्कम नेली जात होती. जप्त करण्यात आलेली रकमेत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
वाहनातून १ कोटी रुपयांची वाहतूक करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नागपूरपासून ४० किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम नेमकी कोणाची आहे, याबद्दल अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र ही रक्कम काळा पैसा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.
‘गोंडखैरी टोलनाक्याजवळ एका कारमध्ये एक कोटी रुपये आढळून आले आहेत. ही सर्व रक्कम पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरुपात आहे. ही रोख रक्कम अमरातीहून नागपूरला नेली जात होती,’ अशी माहिती पोलीस उपाधीक्षक मिलिंद तोतरे यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
