व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच केल्यानंतर व्हॉट्सअॅप आता नवी फीचरची चाचणी करत आहे. या नव्या फीचरमध्ये तुम्ही कोणताही व्हिडीओ डाऊनलोड न करताही पाहू शकणार आहात. याआधी एखाद्याने पाठवलेला व्हिडीओ पूर्णपणे डाऊनलोड झाल्यानंतरच पाहता येत होता.
मात्र, या नव्या फीचरमुळे एखादा व्हिडीओ डाऊनलोड प्रक्रियेत असतानाच तुम्हाला पाहता येणे शक्य होणार आहे. याद्वारे व्हिडीओमध्ये नेमके काय आहे, हे पाहता येणार आहे. व्हिडीओतील मजकूर आवडला नाही तर तुम्ही डाऊनलोडची प्रक्रिया तात्काळ रद्द करू शकता. यामुळे तुमचा नेटपॅकमधील डेटा आता फुटक जाणार नाही.
व्हॉटसअॅपचे हे नवीन फीचर सध्या अँड्रॉईड मोबाइलवर उपलब्ध होणार असून iOS यूजर्सना यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. एखादा व्हिडीओ व्हॉट्सअॅप आल्यास अँड्रॉईडच्या बीटा अॅपमध्ये तुम्हाला प्लेचे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनखाली व्हिडीओची साईज नमूद केली जाणार आहे. प्लेचे ऑप्शन निवडल्यानंतर व्हिडीओ स्ट्रीम होण्यास सुरू होईल.
स्ट्रीमिंग इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून असेल. स्ट्रीमिंगवेळी व्हिडीओ व्हॉट्सअॅपवरच प्ले होतो, मात्र डाऊनलोड झाल्यानंतर हा व्हिडीओ कोणत्या प्लेअरवर प्ले करायचा आहे, याचा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. याद्वारे व्हिडीओ डाऊनलोड करायचा की नाही, याचा पूर्ण कंट्रोल आता तुमच्या हातात असणार आहे.
