चर्चगेट ते डोंबिवली लोकलचा विचार करा

चर्चगेट रेल्वे स्थानकावरून ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ यांसारख्या मध्य उपनगरांमध्ये लोकल सुरू करण्याचा विचार करा, अशी सूचना बुधवारी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केली.

सीएसटी स्थानकावरून अंधेरी, वांद्रेपर्यंत लोकल सोडण्यात येते, त्याचप्रमाणे, चर्चगेटवरूनही ठाणे, डोंबिवली, अंबरनाथपर्यंत लोकल सोडण्यात याव्यात, असे मत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. सध्या चर्चगेटवरून पश्चिम उपनगर आणि त्या पुढील भागांपर्यंत सोडण्यात येत आहे.

‘मध्य रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कार्यालये नरिमन पॉइंट, चर्चगेट या भागात आहेत. कार्यालयांमधून निघाल्यावर, त्यांना सीएसटीवरून लोकल पकडावी लागते. चर्चगेटवरून मध्य उपनगरामंध्ये लोकल सुरू करण्यात आली, तर त्यांना सीएसटीला न जाताच चर्चगेटवरून लोकल मिळेल,’ असे खंडपीठाने म्हटले. ‘आमच्या या सूचनेवर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना विचार करू दे. कदाचित नवा कॉरिडोअर उभारला जाऊ शकतो,’ असे खंडपीठाने सुनावणीवेळी म्हटले. गर्दीच्या वेळी भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना अनेक जणांचा मृत्यू होत असल्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *