अत्याधुनिक यंत्रमानवाच्या क्षमतेचे दर्शन घडवणारा रजनीकांतचा रोबो हा चित्रपट आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेलच. या चित्रपटात ऐश्वर्या रॉयच्या प्रेमात पडलेला चिट्टी हा रोबो खुद्द आपल्या जन्मदात्या वसिकरण (रजनीकांत) च्या जिवावर उठला होता हेही तुम्हाला आठवत असेल. हे झालं सिनेमातलं, पण एका रोबोने प्रत्यक्षात माणसावर हल्ला केल्याची घटना चीनमध्ये घडली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात कुठलीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. त्यातूनचा माणसारखी कामे करणारे, चालते बोलते रोबो बनवण्यात यश मिळवले आहे. चीनमध्ये अशाच आधुनिक रोबोंचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात फॅटी नावाच्या रोबोने अचानक ग्लास बुथ तोडला. त्यानंतर त्याने तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीवरही हल्ला केला. दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर फॅटीला प्रदर्शनातून हटलण्यात आले आहे.
