शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत झोपेत असलेल्या मायलेकराचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील उमरगा येथील ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. शुभांगी बिराजदार (28 वर्ष) त्यांच्या अवघ्या तीन वर्षांचा चिमुकला प्रेमचा आगीमध्ये होरपळल्याने मृत्यू झाला आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
उमरगा गावातील किराणा दुकानदार रामदास बिराजदार यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे घरातील आणि दुकानातील सर्व सामान एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. याच खोलीत हे मायलेक झोपले होते. आई-मुलगा झोपेत असल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची त्यांना समजले नाही, आणि लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्या दोघांचा मृत्यू झाला.
सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रामदास बिराजदार बांधकामाला पाणी मारण्यासाठी उठले असताना त्यांना घरातून स्फोटाचे आवाज आणि धूराचे लोट येताना दिसले. यावेळी त्यांनी शेजा-यांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करुन पाणी मारुन आग विझवली. तोपर्यंत त्यांची पत्नी शुभांगी आणि मुलगा प्रेमने जिव सोडला होता.
विद्युत प्रवाहामुळेच आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन उपजिल्हा रुग्णालयात निलंगा येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.