ते आले.. नग्न करून बेदम चोप देऊन गेले, पण का?

हाच तो… हाच तो… सोडायचा नाही याला’ असे ओरडत अचानक आलेल्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण सुरू केली. त्यानंतर त्या तरुणाला दुचाकीवर बसवून निर्जन स्थळी नेले आणि झाडाला बांधून नग्न करून बांबू आणि सळईने बेदम मारहाण केली. त्यानंतर चेहरा लक्षात ठेव, असे बजावत, ही मंडळी निघूनही गेली. मात्र आपल्याला का मारले हेच त्या तरुणाला अजून कळले नाही. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नाही, तर गजबजलेल्या लालबाग परिसरात घडलेली घटना आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात राहणाऱ्या गजेंद्र बाळाराम अधिकारी (२२) हा तरुण गुरुवारी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतत होता. मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक काही तरुणांचा घोळका त्याच्यासमोर आला आणि हाच तो, हाच तो, करत त्यांनी त्याला घेराव घातला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. ‘‘अरे मी काय केले, मला का मारताय, मला सोडा,’’ अशी विनवणी करूनही ही मंडळी त्याला मारतच राहिली. त्याच्यासोबत असलेल्या मित्र अतुल नलावडेलाही त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि गजेंद्रला बाइकवर बसवून लालबाग डायलिसीस सेंटरकडे घेऊन गेले. तेथे झाडाला बांधून त्याला नग्न केले आणि पुन्हा बांबू आणि लोखंडी सळईने मारहाण केली. मारहाणीनंतर हा ‘चेहरा लक्षात ठेव’ म्हणत ही मंडळी पसार झाली.

या घटनेनंतर गजेेंद्रने घर गाठले. त्या वेळी तो काहीच बोलण्याचा मन:स्थितीत नव्हता. घरच्यांनी त्याला केईएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. आपल्याला मारहाण का झाली, याचे कारण कळावे आणि मारहाण करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, असे त्याचे म्हणणे असून त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या मारहाणीत लालबागचा राजा मंडळाचा कार्यकारी सदस्य असलेल्या रुपेश जाधवही असल्याचा आरोप गजेंद्रने केला आहे. कारण या वेळी त्याने त्याचा चेहरा पाहिला होता. गजेंद्रने दिलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात रुपेश जाधवसह विक्रांत उर्फ विक्की, सिद्धेश उर्फ सिद्धू अशी आरोपींची नावे आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

>आरोपींवर कडक कारवाई व्हावी

माझा कुणाशी वाद नाही किंवा साधे भांडणही नाही. त्यामुळे मला का मारहाण झाली हे कळले नाही. मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गजेंद्रने  बोलताना केली आहे.

>अधिक माहिती घेण्यात येईल

रुपेश जाधव हा लालबागच्या राजा मंडळाचा कार्यकारिणी सदस्य आहे. या प्रकरणात त्याचा काय संबंध आहे, याची अधिक माहिती घेत आहोत.

– बाळासाहेब कांबळे,

अध्यक्ष : लालबाग राजा मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *