‘स्वच्छ भारत’ मोहीम असूनही शहरांत ‘उघड्यावरच’

भारतात शहरांचे विस्तारीकरण भयंकर वेगाने होत असून जगात सर्वांत जास्त नागरी वसाहती भारतात असल्या तरी तिथे सुरक्षित आणि खासगी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे सरकारने स्वच्छ भारत मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले असले तरी लोकांना उघड्यावर शौचास जाणे बंद झालेले नाही.

ही माहिती वॉटरएड या जागतिक पातळीवरील अशासकीय संस्थेने अहवालात दिली. सुरक्षित, खासगी स्वच्छतागृहांशिवाय १५७ दशलक्ष लोक शहरी भागांत वास्तव्यास असून भारताचा याबाबतीत पहिला क्रमांक आहे. शहरी भागांतील ४१ दशलक्ष लोक उघड्यावर शौचास जातात, असे हा अहवाल म्हणतो.

वॉटरएड ही इंग्लडमधील संस्था असून ती सुरक्षित पाणी आणि आरोग्य यासाठी काम करते. या संस्थेने जागतिक पातळीवर स्वच्छतागृहांचे वार्षिक विश्लेषण करणारा ‘ओव्हरफ्लोर्इंग सिटीज द स्टेट आॅफ द वर्ल्डस् टॉयलेट्स २०१६’ अहवाल तयार केला असून तो १९ नोव्हेंबर या जागतिक स्वच्छतागृह दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित केला आहे. त्यात म्हटले आहे की अतिलोकसंख्येच्या नागरी भागांत आरोग्याच्या चांगल्या सोईसुविधांच्या अभावामुळे रोगराई तेथे झपाट्याने पसरत आहे.

भारतातील शहरे आणि गावांमध्ये दररोज निर्माण होणारी मानवी विष्ठा ही रोज आॅलिंपिक स्पर्धेसाठीच्या आठ पोहण्याचे तलाव किंवा आठ जंबोजेट विमाने भरतील एवढी आहे. भारतात शहरी भागात स्थलांतर वाढत आहे. ही गावे आणि शहरांची वाढ समान आणि विशिष्ट पातळीवर कायम राहिल्यासच देशाचे आरोग्य सुधारेल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेने ओळखले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज पश्चिम युरोपच्या लोकसंख्येइतकी म्हणजे साधारणत: ३८१ दशलक्ष भारताची लोकसंख्या वेगाने वाढणाऱ्या नागरी भागात राहात आहे तर १५७ दशलक्ष लोकांना सुरक्षित असे स्वच्छतागृहेच उपलब्ध नाहीत.

भारत सरकारने स्वच्छतेला प्राधान्य दिलेले असले तरी शहरांमध्ये स्वच्छतागृहांशिवाय वाढलेल्या वसाहतींची संख्या २००० वर्षांत २६ दशलक्षांनी वाढली आहे. शहरांच्या विस्तारीकरणाचा वेग हा भयंकर म्हणता येईल असा असल्याचे हा अहवाल सांगतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *