बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करून दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणली आहे. ही नोट चलनात येऊन पाच दिवस उलटायच्या आधीच तिची बनावट नोट बाजारात आली आहे.
नव्याने बाजारात आलेल्या दोन हजारांच्या नोटांची छपाई आणि कागद अत्यंत निकृष्ट असल्याने तिची बनावट नोट करणे अधिक सोपे असल्याचे बोलले जाते. दोन हजारांची नोट काळा पैसा जमविणा-यांनाही सोयीची झाली असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे.
काळया पैशाला आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केली. पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करीत असताना दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली आहे. चलनात आणलेल्या दोन हजारांच्या नोटेची एकंदर छपाई आणि कागद अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहे. ही नोट हातात घेतली की तिच्या छपाईचा रंग हाताला लागत आहे.
कागदही अत्यंत पातळ आणि निकृष्ट दर्जाचा आहे. पूर्वी लहान मुलांच्या खेळण्यात जशी नोट असायची तशीच या नोटेची अवस्था आहे. म्हणूनच या नोटेची बनावट नोट करणे अत्यंत सोपे असल्याने एक आठवडयाच्या आत दोन हजार रुपयांची बनावट नोट बाजारात आली आहे. कलर पिंट्रर, नोटेचा कागद आणि स्कॅनिंग मशिनचा वापर करून ही बनावट नोट तयार करण्यात येत असल्याचे समजते.
काळया पैशाला आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ही नवी दोन हजारांची नोट बाजारात आणल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी या नोटेमुळे या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन मिळण्याचीच जास्त शक्यता आहे. नव्या नोटेची बनावट छपाई करणे खूप सोईचे आहे. त्यामुळे अशा नोटा बाजारात आल्याची शक्यता मोठया प्रमाणात वर्तविण्यात येत आहे. तर काळया पैशाला आळा घालण्यातही नोट अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. ही नोट दोन हजारांची असल्याने काळा पैसा रोखीने एका जागेवरून दुस-या जागी हलविण्यात आणि साठविण्यात सोईचा होणार आहे.
कालच कोल्हापूरमध्ये एका मुख्याध्यापकाच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक चंद्रकांत सावर्डेकरला ३५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून दोन हजार रुपयांच्या १७ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
एकीकडे सामान्य माणसांना दोन हजार रुपये मिळविण्यासाठी दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागत असताना लाच देण्यासाठी दोन हजारांच्या १७ नोटा आल्या कुठून? म्हणजे काळा पैसा निर्माण होण्यास सुरुवात झाली असल्याचेच हे संकेत असल्याची प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून व्यक्त केली जात आहे.
