पैसे असेपर्यंत बस धावणार!

जोपर्यंत आमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत, तोपर्यंतच शाळेच्या बसेस रस्त्यावर धावतील’, असा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ने दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नोटबंदीने आधीच हवालदिल झालेल्या पालकांच्या गोंधळात आणखी एक भर पडणार असून नोटबंदीचेच कारण पुढे करत पालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या संघटनेकडून केला जात आहे. तर दुसरीकडे यामुळे टॅक्सी-रिक्षाचालकांचे फावणार आहे.

दिवाळीच्या सुटय़ा संपून सोमवार-मंगळवारी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आमच्याकडे बस सुरू ठेवण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत, अशी तक्रार शाळा बसचालकांनी केली आहे. जोपर्यंत आमच्याजवळ पैसे आहेत, तोपर्यंतच आम्ही शाळेच्या बसेस चालवणार, असा निर्णय ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी जाहीर केला आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार आहे.

आमच्या प्रत्येक बसला दिवसाला किमान १००० रुपये डिझेलसाठी खर्च येतो.

बँकेतून सध्या अवघे २४ हजार रुपयेच काढण्याची परवानगी आहे, त्यापेक्षा जास्त काढल्यास चौकशी सुरू होते. त्यामुळे आहे त्या पैशात कदाचित फक्त आठवडाभरच रस्त्यावर शाळेच्या बसेस धावू शकतात. शाळेच्या बस फार लांब जात नाहीत, त्या शहरातच फिरतात. त्यामुळे सहसा ‘पेट्रोकार्ड’ काढले जात नाही, अशी  हेतुपुरस्सर भूमिका त्यांनी घेतली आहे. जर येत्या काही दिवसांत बँकेतून पैसे काढता न आल्यास संपूर्ण राज्यात शाळेच्या बसेस बंद होतील, असेही गर्ग यांनी म्हटले आहे.

  • संपूर्ण मुंबईत ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ संघटनेच्या १० हजार शाळेच्या बसेस दररोज धावतात.
  • राज्यभरात किमान ४० हजार शाळेच्या बसेस धावतात.
  • संघटनेने घेतलेला हा निर्णय कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *