मुंबईला प्रदूषणाचा विळखा

उद्यापर्यंत स्थिती सुधारण्याची शक्यता; ‘सफर’ संकेतस्थळावरील माहिती

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल आणि नवी मुंबई या भागांतील हवेच्या गुणवत्तेच्या प्रमाणाने ‘अत्यंत वाईट’ पातळी गाठल्याचे ‘सफर’च्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

संपूर्ण मुंबईत हवेचा दर्जा ‘वाईट’, तर वांद्रे-कुर्ला संकुल व नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाच्या हवामान व हवेच्या गुणवत्तेची नोंद ठेवणाऱ्या ‘सफर’ या संकेतस्थळावर म्हटले आहे. मुंबईत वारा कमी झाल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र मंगळवापर्यंत ही स्थिती सुधारेल, असा दावा ‘सफर’ संकेतस्थळाचे प्रकल्प संचालक डॉ. गुफ्रान बैग यांनी केला आहे. या काळात नागरिकांनी कमी व्यायाम करावा व कमी मेहनतीची कामे करावी, असेही डॉ. बैग यांनी सूचित केले आहे.

या संकेतस्थळावर रविवारी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान संपूर्ण मुंबईतील हवेची गुणवत्ता २४२ या ‘वाईट’ प्रमाणात दर्शवत होती, तर कुलाबा, बोरिवली, भांडुप या भागांतील हवेची गुणवत्ता समाधानकारक दर्शवत होती. मात्र इतर सात ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता ‘वाईट’ व ‘अत्यंत वाईट’ असल्याचे दिसून आले. यात नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता ३२२ व वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात ३०२ इतकी असल्याचे दिसून आले, तर अंधेरी व माझगाव परिसरांत हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

हवेची प्रतवारी

  • नवी मुंबई- ३२२, बीकेसी- ३०२, अंधेरी- २८३, माझगाव- २७६, वरळी- २५६, मालाड- २५२, चेंबूर- २२८, बोरिवली- १७६, कुलाबा- १७३, भांडुप- १५९.
  • हवेची गुणवत्ता २०० ते २९९ इतकी असल्यास ती ‘वाईट’ या प्रमाणात, तर ३०० ते ३९९ या प्रमाणात ती ‘अत्यंत वाईट’ प्रमाणात मानली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *