अमेरिकेच्या अध्यक्षपदावर नव्याने निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाला केवळ एका डॉलरचे मानधन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वर्षाकाठी ४ लाख डॉलर्स इतके मानधन मिळते. मात्र, मी हे मानधन घेणार नसल्याचे ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. ट्रम्प यांनी सप्टेंबर महिन्यात निवडणूक प्रचारादरम्यान हा विचार बोलून दाखविला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला किती मानधन मिळते, हे माहित नाही. मात्र, मला कायद्यानुसार निदान १ डॉलर इतके मानधन घेणे बंधनकारक आहे, त्यामुळे मी ते घेईन. तसेच राष्ट्राध्यक्ष असताना मी एकाही दिवसाची सुट्टी घेणार नसल्याचेही ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओत सांगितले होते.
आपल्यासमोर किती काम आहे. मला लोकांसाठी शक्य तितक्या लवकर हे काम आटपायचे आहे. आपण कर कमी करत आहोत, लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. या सगळ्याचा पसारा खूप मोठा आहे. त्यामुळे आपण एखादी मोठी सुट्टी घ्यावी, असे मला वाटत नाही, असे ट्रम्प यांना सांगितले. अमेरिकन अध्यक्षपदासाठी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकपणे पराभव केला होता.
दरम्यान, सुट्टी न घेण्याच्याबाबतीत ट्रम्प यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करता येऊ शकते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून एक दिवसही सुट्टी घेतली नसल्याचे माहिती अधिकारांतंर्गत उघड झाले आहे. नरेंद्र मोदी दिवसाचे १८ तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करत असल्याचा खुलासा मध्यंतरी पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आला होता.