रोजच्या आहारातील पदार्थात दालचिनीचा समावेश केला तर शरीराचे तापमान दोन अंशांनी कमी होऊ शकते व त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. याबाबत डुकरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, दालचिनीमुळे त्यांच्या पोटातील थर व्यवस्थित राहतात, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे प्रकल्प संचालक कोरोश झदेह यांनी दिली. कक्ष तापमानाला डुकरांना दालचिनीयुक्त आहार दिला असता त्यांच्या पोटात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले. तसेच गॅस्ट्रिक अॅसिड व पेप्सिन कमी झाले. त्यामुळे त्यांचे पोट थंड झाले. जेव्हा डुकरांच्या शरीराचे तापमान जास्त असते तेव्हा त्यांच्या शरीरात कार्बन डाय ऑक्साइड कमी होतो. दालचिनीने तो आणखी कमी होतो, पण त्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसते. दालचिनीमुळे पोटाचे तापमान दोन अंश सेल्सियसने कमी होते. उष्ण कटिबंधातील लोक थंडाव्यासाठी दालचिनीचा वापर करतात, असे या विद्यापीठाचे डॉ. जियना झेन व नरेश पिल्ले यांनी म्हटले आहे. पचनानंतर पोटात वायू तयार होतात व त्यांच्या प्रमाणावर
आतडय़ाचे आरोग्य अवलंबून असते. या प्रयोगात वायू संवेदक कॅप्सूल डुकरांच्या शरीरात सोडण्यात आल्या होत्या. पोटाच्या विकारांचे निदानही अशा कॅप्सूलच्या मदतीने करता येते.
