ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार एकमेकांसमोर जाणं तर टाळतातच, पण एकमेकांविषयी साधी प्रतिक्रियाही देत नाहीत. मात्र बॉलिवूडमधील एकेकाळचे लव्हबर्ड्स शाहिद आणि करिना आगामी ‘उडता पंजाब’मध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यातच शाहिदचं लग्न ठरल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूरने दिली आहे.
शाहिदच्या लग्नाला कदाचित उपस्थित राहू, असंही करिनाने सांगितलं. ‘लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे, मी शाहिद-मीराला लग्नाच्या शुभेच्छा देते. त्यांचा विवाहसोहळा शानदार पद्धतीने पार पडू देत’ असं करिनाने म्हटलं आहे. शाहिदने मीरासोबत लग्न ठरल्याची घोषणा करण्यापूर्वीच मला सांगितलं होतं अशीही माहिती तिने दिली.
शाहिदला हैदरसाठी मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आनंदी असल्याचं करिना म्हणाली. शाहिद उत्तम अभिनेता असून त्याच्यासोबत पुन्हा-पुन्हा काम करायला आवडेल, अशी इच्छाही करिनाने व्यक्त केली.
करिना आणि शाहिद 3 वर्ष एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ‘जब वि मेट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 2007 मध्ये शाहिद-करिना वेगळे झाले. 3 वर्षांपूर्वी करिना आणि सैफ अली खान यांचं लग्न झालं. ब्रेकअपनंतर शाहिद-करिना पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अर्थात ‘उडता पंजाब’मध्ये दोघांची एकत्र जोडी नसून आलिया भट चित्रपटात दिसणार आहे.
शाहीद आणि मीरा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विवाहबद्ध होणार आहेत. करिनानंतर शाहिदचं नाव प्रियंका चोप्रा, विद्या बालन, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, नर्गिस फक्री, बिपाशा बासू, हुमा कुरेशीसोबत जोडलं जात होतं.

