पुण्यातील चाकण रोडजवळ असलेल्या कापडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये पाचजण ठार झाले. ही घटना गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
कल्पना विजय सिरसाठ (२९), राधा हरेश ठाकूर (२६), उज्ज्वला दिलीप सोन्साळे (३५), कुसूम संदीप साखरकर (३०) व रामदास पराश्रम राठोड (५२) असे या अपघातात मृत्यू झालेल्याची नावे आहेत.
तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथील सना एंटरप्रायजेस या कापसाच्या कामाशी संबंधीत गोडाऊन आहे. गुरूवारी सकाळी अचानक या गोडाऊनला आग लागली. आग लागल्याचे समजताच रस्त्यावरील काही नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीश्मन दलाच्या पाच गाड्या, पाच पाण्याचे टँकर मागवण्यात आले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
कापसाचे गोडाऊन असल्यामुळे आग भडकत असून धुराचे मोठे लोट उठले आहेत. दरम्यान, नागरिकांची या परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
या गोडाऊनमध्ये महिला कामगारांची संख्या जास्त आहे. या आगीमध्ये पाचजण ठार झाल्याची माहिती मिळाली असून यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेष आहे. आगीत आणखी व्यक्ती अडकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही.
