हायवेवरून झेपावणार हवाई दलाची विमाने

उरी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्काराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने आपातकालीन स्थितीत आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हवाई हालचाली करण्यासाठी देशाच्या विविध भागातील 21 महामार्गांची निवड केली आहे. यापैकी बहुतांश महामार्ग हे पाकिस्तानला लागून असलेल्या राजस्थान आणि गुजरातमधील आहेत. तसेच काही महामार्ग हे आंतरराष्ट्रीय सीमेवरची राज्ये असलेल्या जम्मू आणि काश्मीर, असाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील आहेत.

विमाने उतरवण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी तसेच इतर आणीबाणीच्या प्रसंगी आवश्यक गरजांचा सखोल अभ्यास करून हवाई दलाने या 21 महामार्गांची निवड केली आहे. तसेच राजस्थानमधील जैसलमेर विभाग आणि गुजरातमधील द्वारका विभागातील काही महामार्ग आणीबाणीच्या प्रसंगी वापरासाठी सूचिबद्ध करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत या महामार्गांचे रूपांतर रनवेमध्ये होणार आहे.
रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपात स्थितीत महामार्गावर विमाने उतरवण्याची शक्यता पडताळण्यासाठी एक समिती नियुक्त करण्याची कल्पना मांडली होती. या समितीमध्ये महामार्ग विभागाचे अधिकारी, संरक्षण विभागातील हवाई दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असावा, असे त्यांनी सुचवले होते.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने युद्धसरावादरम्यान विमाने उतरवण्यासाठी इस्लामाबाद आणि लाहोरमधील मुख्य महामार्ग बंद केला होता. त्यानंतर पर्रिकर यांनी गडकरींना पत्र लिहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *