तब्बल पंधरा वर्षांनंतर परदेशात भव्यदिव्य समारंभाची जय्यत तयारी

तब्बल पंधरा वर्षांनंतर परदेशात भव्यदिव्य समारंभाची जय्यत तयारी

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’चे प्रयोग लंडन येथील प्रसिद्ध वेम्बले सभागृहात जूनमध्ये होत असून त्यासाठी गुजरातमधील मातब्बर संस्थांनी पुढाकार घेतला आहे. तब्बल पंधरा वर्षांनंतर परदेशात होत असलेल्या या भव्यदिव्य समारंभाची जय्यत तयारी झाली असून, छत्रपतींवरील ‘सुरतेच्या लुटी’चा आरोप मागे ठेवत ‘बँक ऑफ बडोदा’ व ‘गुजरात पर्यटन विभागा’ने या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारत व्यावसायिकतेचे दर्शन घडवले आहे.
‘जाणता राजा’च्या माध्यमातून शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींचा इतिहास संपूर्ण देशभरात नेला आणि नव्याने इतिहास घडवला. याही वयात त्याच तडफेने छत्रपतींचे चरित्र सामान्यजनांपर्यंत पोहोचवणाऱ्या पुरंदरे यांच्या कल्पनाशक्तीतून साकारलेल्या जाणता राजाचा प्रयोग पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेत झाला होता. पुन्हा एकदा ‘जाणता राजा- द पीपल्स किंग’ विदेशात जाण्यास सज्ज झाला असून २० व २१ जून रोजी लंडनच्या प्रसिद्ध वेम्बले सभागृहात याचे प्रयोग होत आहेत. इंग्रजीतून महाराजांची ओळख सांगून त्यानंतर हिंदीतून हा प्रयोग होईल. उंट, घोडे, बैलगाडय़ांसह २०० कलाकारांचा तेवढाच भव्य प्रयोग लंडनमध्ये दोन वेळा होईल. प्रत्येकी तीन तासाच्या या प्रयोगासाठीची सर्व तयारी पूर्ण होण्याचा मार्गावर असून नेपथ्याचे सामानही लंडनमध्ये पोहोचले आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी बँक ऑफ बडोदा हे मुख्य प्रायोजक असून गुजरात पर्यटन विभाग सहप्रायोजक आहेत. जाणता राजाच्या या सोहळ्यासाठी भारत व इंग्लंडमधील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शिवछत्रपतींचा इतिहास संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी आम्ही विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून लंडन येथील प्रयोग त्यांचाच भाग आहेत. यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात तसेच दक्षिणेतील राज्यांमधूनही अनेकजण पुढे आले आहेत, असे बाबासाहेब पुरंदरे यांचे सहाय्यक शैलेश वरखडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *