दाऊदने दिली शाहिद अफ्रिदीला धमकी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीला धमकी दिली आहे. जावेद मियादादच्या विरोधात बोलल्याबद्दल दाऊदने शाहिद अफ्रिदीला धमकावलं आहे. 12 ऑक्टोबरला दाऊदने शाहिद अफ्रिदीला फोन करुन धमकी दिली आहे. दाऊद आणि मियादाद नातेवाईक असून दाऊदच्या मुलीचं मियादादच्या मुलाशी लग्न झालेलं आहे.
इंटरनॅशनल बिजनेस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार दाऊदने शाहिद अफ्रिदीला जावेद मियादादच्या विरोधात न बोलण्याची तंबी दिली आहे. जावेद मियादादने अफ्रिदीवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला होता. त्यानंतर अफ्रिदीने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं.
जावेद मियादाद आणि शाहिद अफ्रिदी यांच्यात झालेल्या एका वादामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार शाहिद अफ्रिदीला स्वत:साठी एक फेअरवेल सामना खेळवायचा होता. अफ्रिदीला फक्त पैशांसाठी खेळायचं आहे असा आरोप जावेद मियादाद यांनी एका टीव्ही शोदरम्यान केला होता. अफ्रिदीने अनेक सामने विकले होते हे आपण सिद्ध करु शकतो असंही जावेद मियादाद बोलले होते.
यानंतर अफ्रिदीने असं बोलणं त्यांना शोभत नाही अशी टीका केली होता. जावेद मियादाद पैशांसाठी भुकेले असल्याचंही अफ्रिदी बोलला होता. मात्र यानंतर अफ्रिदीने ट्विट करुन माफीदेखील मागितली होती.
अफ्रिदीच्या याच वक्तव्यावरुन नाराज झालेल्या दाऊद इब्राहिमने धमकी दिल्याचं कळत आहे. दाऊदने 12 ऑक्टोबरला अफ्रिदीला फोन करुन शांत राहायला सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *