प्रवाशांची वाढती गर्दी व मालवाहतुकीच्या विस्तारीकरणासाठी कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या बहुप्रतीक्षेत योजनेला गती मिळाली असून; येत्या दोन दिवसांत या कामाच्या मुहूर्ताचा नारळ फुटणार आहे.
पाऊस पूर्णपणे ओसरल्यानंतर दिवाळीत दुपरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी माणगाव येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले असून; त्याठिकाणी उपमुख्य अभियंत्याची स्वतंत्र आस्थापनाही तयार करण्यात आली आहे.
सोमवारी खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर दुपदरीकरणाची जबाबदारी असलेल्या या स्वतंत्र कार्यालयाचे अनौपचारिक उद्घाटनही करण्यात आले. या वेळी काही मोजक्या अधिका-यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजनही करण्यात आले.
येत्या दोन दिवसांत कोकण रेल्वेच्या दुपरीकरण कामाच्या मुहूर्ताचा नारळ फोडला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १४० कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. माणगाव ते कोलाड या टप्प्यातील दुपरीकरण प्रथम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.
रेल्वे सुविधा अधिक गतिमान होण्यासाठी विद्युतीकरण व दुहेरीकरण या दोन्ही योजना अनेक वर्षांपासून चर्चेत आहे; मात्र काळाची गरज म्हणून विद्युतीकरणाचे काम प्रथम पूर्ण करण्याची योजना रेल्वेने हाती घेतली होती. त्याच जोडीला आता दुहेरीकरणाचे कामही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे उद्दिष्टय़ ठेवण्यात आले आहे.
या दोन्ही बाबी पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ तर कमी होईलच; पण या मार्गावर अधिकाधिक गाडया सुरू करणेही शक्य होणार आहे. गेली अनेक वर्षे या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता दुहेरीकरणाच्या मागणीने जोर धरला होता. आता ही योजना कार्यान्वयाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे.