पिझ्झा टॉपिंग्जबाबत अनेक लोक ‘चूजी’ असतात. अनेकांना पिझ्झावर काय काय हवे, याची स्वतःची आवड-निवड असते. त्यामुळे पिझ्झा बनवणारेही याबाबत अनेक प्रयोग करून पाहत असतात. नॅशनल चीज पिझ्झा डेच्या निमित्ताने एका ऑस्ट्रेलियन रेस्टॉरंटने एक शानदार ‘ट्रीट’ तयार केले. एका पिझ्झावरील टॉपिंग 99 वेगवेगळ्या चीजचे बनवले होते. शिवाय यामध्ये होते 24 कॅरेटचे खाण्यायोग्य सोने!
हा ऑस्ट्रेलियातील पहिला 24 कॅरेट गोल्ड पिझ्झा बराच प्रसिद्धही झाला. या ‘गोल्डनमार्गेरिटा’मध्ये पिझ्झामधील एरवीची सर्व सामग्री आहेच. शिवाय त्यावर ही 24 कॅरेट सोन्याच्या पानांची टॉपिंग करण्यात आली होती. आता हा पिझ्झा सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध केला जात आहे. गुरुवारपासून तो तिथे 3326 रुपयांना उपलब्ध होईल. यादिवशी तो ऑर्डर करणार्या पहिल्या शंभर ग्राहकांना तो मोफत दिला जाणार आहे. अशा प्रकारचा पिझ्झा ही काही फारशी नवलाईची बाब नाही. जपानमध्ये टोकियोतील मॅजिक ओपनमध्ये गोल्ड लीफ पिझ्झा 7185 रुपयांना मिळतो. तसेच माल्टामधील एका रेस्टॉरंटमध्ये तो 26,611 रुपयांना मिळतो. हा जगातील सर्वात महागडा पिझ्झा म्हणून ओळखला जातो.