जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीनंतरदेखील जगभरातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत 10 कोटींची घट झाली आहे, अशी माहिती जागतिक बँकेकडून देण्यात आली.
बँकेच्या नव्या आकडेवारीनुसार, 2013 साली तब्बल 76.7 कोटी लोकांचे प्रतिदिन उत्पन्न 1.90 डॉलरएवढे होते. अगोदरच्या वर्षातन (2012) हा आकडा 88.1 कोटी होता. विशेषतः आशियातील लोकांच्या उत्पन्नात अधिक वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती असूनसुद्धा दारिद्र्य नष्ट करीत सर्व देशांची समृद्धीकडे सुरु असलेली वाटचाल उल्लेखनीय आहे, असे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी व्यक्त केले.
गेल्या शतकभरात दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांच्या संख्येत निश्चितपणे घट झाली आहे. लोकसंख्या वाढीनंतरदेखील 1990 च्या तुलनेत 2013 साली दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत 1.1 अब्जांची घट झाली आहे. त्यामुळे 2030 पर्यंत दारिद्र्य नष्ट करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट जवळ आल्याचे सिद्ध होत आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. परंतु, हे साध्य करण्यासाठी विषमता नष्ट करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये लोकांच्या उत्पन्नातील विषमता वाढली आहे. मात्र, 40 देशांमध्ये विषमता कमी झाल्याचे नव्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. यामध्ये ब्राझील, पेरु, मली आणि कंबोडियासारख्या देशांचा समावेश आहे.
दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचा आकडा 2015 साली पहिल्यांदाच जागतिक लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा खाली जाईल असा अंदाज जागतिक बँकेकडून वर्तविण्यात आला होता.
