येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना पुरेशा सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे कार्यरत डॉक्टरांना कामाचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. अद्याप तज्ज्ञ डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त आहेत. यामुळे खासगी रुग्णालयात पैसे खर्च करण्याची वेळ रुग्णांवर येत आहे.
तालुक्यातील रुग्णांना सर्व तंत्रयुक्त आरोग्यसेवा देण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा पर्याय असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे येतात; परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त पदेच भरली गेली नसल्यामुळे आणि त्यातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या बदल्या अचानक केल्यामुळे, तसेच बंदावस्थेतील यंत्रसामग्रीमुळे रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना स्वतःचे पैसे खर्ची घालून उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची अद्याप 4 पदे भरली असून, 4 पदे रिक्त आहेत. यात सर्जन, भूलतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, हाडांचे तज्ज्ञ यांची प्रत्येकी 1, तर वैद्यकीय अधिकारी 1 व दंत्त चिकित्सकाचे 1 पद रिक्त आहे. या रिक्त पदांसंबंधी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून, प्रत्येक दोन ते तीन महिन्यांनंतर रिक्त पदांचा अहवाल शल्यचिकित्सकांकडे सादर करण्यात येतो. यासंबंधीचा अहवाल 27 सप्टेंबरला पाठविण्यात आला होता, असे येथील वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी सांगितले. असे असूनही जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत पाच दिवसांपूर्वीच रुग्णालयातील अपघात विभागात कार्यरत असणारे तज्ज्ञ डॉ. हेवाळे यांची बदली दोडामार्ग येथे करण्यात आली. दोडामार्ग येथील रुग्णालयातील डॉ. बी. एन. पितळे हे पुढील शिक्षणासाठी गेल्यामुळे तेथील पद रिक्त झाले होते. त्या जागी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले; मात्र सद्यःस्थितीत उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. रुग्णालयातील ह्रदयरोगतज्ज्ञ अभिजित चितारी व बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांना बाह्यरुग्ण विभागासोबत, आपत्कालीन विभाग व आंतररुग्णांची जबाबदारी सांभाळण्याची वेळ येत आहे. मुळात रिक्त पदांचे ग्रहण लागलेल्या या रुग्णालयातील डॉ. तळणकर व डॉ. पितळे यांची बदली करण्यात आली होती. अतिरिक्त भार पडल्यामुळे रात्रीचे 1 ते 2 वाजेपर्यंत काम करून सकाळी पुन्हा 9 वाजता हजर राहावे लागत आहे. त्याचा त्रास होत आहे, अशी खंत डॉ. चितारी यांनी व्यक्त केली. यासाठी शासनाने लवकरात लवकर विचार करावा व समस्या सोडवावी, असे ते म्हणाले. तालुक्यातील बरेच लोक रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालयातील अनेक आवश्यक तंत्रसामाग्रीही बंदावस्थेत आहे. येथे येणाऱ्या सर्वच रुग्णांना महत्त्वाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही. त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत व रुग्णालयातील इतर समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी रुग्णालयातील डॉक्टर व नागरिकांकडून करण्यात होत आहे.
