एकीकडे लाचलुचपत खात्याची छापेमारी सुरु असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आता आणखी एका संकटात सापडण्याची शक्यता आहे. कारण गृहमंत्री असताना भुजबळांनी तेलमाफियांना पाठीशी घातल्याचा आरोप माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी केला आहे.
कोकीळ यांनी भुजबळांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. शिवाय तेलमाफियांवर कारवाई करू नये यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा सनसनाटी आरोप, कोकीळ यांनी केला आहे.
कोकीळ हे 2000 साली भायखळा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यावेळी तिथे आयपीएस अजयकुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीला तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त रॉनी मेंडोंसा यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यावेळचे गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तसा विरोध दर्शवला होता. मात्र या भ्रष्ट अधिकाऱ्याची तिथे नियुक्ती केलीच, असं कोकीळ यांनी म्हटलं आहे.
या अजयकुमार जैन यांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. माझ्या तक्रारीवर एसीबीने त्यांना पकडलं. त्यांच्याविरोधात 13 वर्षे खटला चालला आणि त्यांना पाच वर्षांची शिक्षाही झाल्याचं कोकीळ यांनी सांगितलं.
त्यानंतर आपली बदली झाली. मात्र इथे मी तेलमाफियांविरोधात कडक कारवाई केली. पण त्याला छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आणि माझ्यावर प्रचंड दबाव टाकायला सुरुवात केली, असा आरोप कोकीळ यांनी केला.
मात्र भुजबळांचा दबाव झुकारून मी माझी कारवाई जोमाने केली. तेलमाफिया, पेट्रोल, डिझेल, रॉकेल भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली, मात्र ही कारवाई भुजबळांना झोंबल्याचा दावा कोकीळ यांनी केला आहे.
कारवाईविरोधात भुजबळ दबाव टाकत होते. त्यामुळे यांच्याविरोधात तत्कालिन पोलीस आयुक्त अरूण पटनायक आणि संजीव दयाळ या दोघांकडेही लेखी तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावाही कोकीळ यांनी केला आहे.
