रूळांना तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी विस्कळीत झाली. सध्या सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सुरूवातीला कुर्ला स्थानकाजवळ रूळांना तडे गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे या मार्गावरील गाड्या थांबविण्यात आल्या. काहीवेळासाठी जलद मार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. या सगळ्या गोंधळामुळे सध्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे धीम्या मार्गावरील गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. जलद लोकल रद्द झाल्याने कुर्ला स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अन्य स्थानकांवरही हीच परिस्थिती आहे. प्रशासनाने दुरूस्तीचे काम तात्काळ पूर्ण केले असले तरी दरम्यानच्या काळात एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काहीवेळापूर्वीच हा बिघाड दुरूस्त झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अजूनही ट्रेन्स उशिराने धावत आहेत.