कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं काल उशिरापर्यंत अहमदनगर पोलिसांकडून यासंबंधीचे काम सुरु होते.साधारणत: 300 पानांचे हे आरोपपत्र असण्याची शक्यता आहे.कोपर्डी बलात्कारप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र कोपर्डी घटनेला 86 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही.नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते.आरोपपत्र दाखल होत नसल्यानं विरोधी पक्ष आणि मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच स्वत: मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे.पोलिसांच्या आरोपपत्रात नेमका काय उल्लेख आढळतो, किती जणांना आरोपी करण्यात येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलैला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या नराधमांना अटक करण्यात आली आहे.