रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणा-यांची सवय असणा-यांना आता तोंड आवरते घ्यावे लागणार आहे. कारण राज्य सरकारने रस्त्यात थुंकणा-यांना प्रतिबंध घालण्यासाठी नवीन कायदा करण्याचे ठरवले आहे. या थुंकीबहाद्दरांना हजार रुपये दंडाबरोबरच सेवेची शिक्षा करण्यात येणार आहे.
विद्यमान कायद्यानुसार थुंकणा-यास ५० रुपयांचा दंड भरून सुटका होत होती. मात्र, नव्या कायद्यात आर्थिक दंड तसेच सामाजिक सेवेच्या शिक्षेचीही तरतूद असणार आहे. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार प्रथम थुंकल्यास १ हजार रुपये दंड तसेच १ दिवसाच्या सामाजिक सेवेची शिक्षा, दुस-यांदा आढळल्यास ३ हजार रुपये दंड व ३ दिवस सामाजिक सेवा, तिस-यांदा आढळल्यास ५ हजार दंड तसेच ५ दिवस सामाजिक सेवेच्या शिक्षेची तरतूद असणार आहे. दंड न भरल्यास सेवेचे दिवस वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

